भगवत गीता : 18 : श्लोक 21-30

श्लोक 21

पृथक्त्वेन तु यज्ज्ञानं नानाभावान्पृथग्विधान्‌।
वेत्ति सर्वेषु भूतेषु तज्ज्ञानं विद्धि राजसम्‌॥

परंतु ज्या ज्ञानाने मनुष्य सर्व भूतांमध्ये भिन्न भिन्न प्रकारांचे अनेक भाव वेगवेगळे जाणतो, ते ज्ञान तू राजस जाण. 

श्लोक 22

यत्तु कृत्स्नवदेकस्मिन्कार्ये सक्तमहैतुकम्‌।
अतत्त्वार्थवदल्पं च तत्तामसमुदाहृतम्‌॥

परंतु जे ज्ञान एका कार्यरूपी शरीरातच पूर्णासारखे आसक्त असते, तसेच जे युक्तिशून्य, तात्त्विक अर्थाने रहित आणि तुच्छ असते, ते तामस म्हटले गेले आहे.

श्लोक 23

नियतं सङ्गरहितमरागद्वेषतः कृतम्‌।
अफलप्रेप्सुना कर्म यत्तत्सात्त्विकमुच्यते॥

जे कर्म शास्त्रविधीने नेमून दिलेले असून कर्तेपणाचा अभिमान न बाळगता फळाची इच्छा न करणाऱ्या माणसाने राग व द्वेष सोडून केलेले असते, ते सात्त्विक म्हटले जाते.

श्लोक 24

यत्तु कामेप्सुना कर्म साहङ्कारेण वा पुनः।
क्रियते बहुलायासं तद्राजसमुदाहृतम्‌॥

परंतु जे कर्म अतिशय परिश्रमपूर्वक तसेच भोगांची इच्छा करणाऱ्या किंवा अहंकार बाळगणाऱ्या माणसाकडून केले जाते, ते राजस म्हटले गेले आहे.

श्लोक 25

अनुबन्धं क्षयं हिंसामनवेक्ष्य च पौरुषम्‌।
मोहादारभ्यते कर्म यत्तत्तामसमुच्यते॥

जे कर्म परिणाम, हानी, हिंसा आणि सामर्थ्य यांचा विचार न करता केवळ अज्ञानाने केले जाते, ते तामस होते. 

श्लोक 26

मुक्तसङ्गोऽनहंवादी धृत्युत्साहसमन्वितः।
सिद्ध्यसिद्ध्योर्निर्विकारः कर्ता सात्त्विक उच्यते॥

जो कर्ता आसक्ती न बाळगणारा, मी, माझे न म्हणणारा, धैर्य व उत्साहाने युक्त, कार्य सिद्ध होवो वा न होवो, त्याविषयी हर्षशोकादी विकारांनी रहित असलेला असतो – तो सात्त्विक म्हटला जातो. 

श्लोक 27

रागी कर्मफलप्रेप्सुर्लुब्धो हिंसात्मकोऽशुचिः।
हर्षशोकान्वितः कर्ता राजसः परिकीर्तितः॥ 

जो कर्ता आसक्ती असलेला, कर्मांच्या फळांची इच्छा बाळगणारा, लोभी, इतरांना पीडा देण्याचा स्वभाव असलेला, अशुद्ध आचरणाचा आणि हर्ष-शोक यांनी युक्त असतो, तो राजस म्हटला जातो. 

श्लोक 28

अयुक्तः प्राकृतः स्तब्धः शठो नैष्कृतिकोऽलसः।
विषादी दीर्घसूत्री च कर्ता तामस उच्यते॥

जो कर्ता अयुक्त, अशिक्षित, घमेंडखोर, धूर्त, दुसऱ्यांची जीवन-वृत्ती नाहीशी करणारा, शोक करणारा, आळशी आणि दीर्घसूत्री असतो, तो तामस म्हटला जातो. 

श्लोक 29

बुद्धेर्भेदं धृतेश्चैव गुणतस्त्रिविधं शृणु।
प्रोच्यमानमशेषेण पृथक्त्वेन धनञ्जय॥

हे धनंजया (अर्थात अर्जुना), आता बुद्धीचे व धृतीचेही गुणांनुसार तीन प्रकारचे भेद माझ्याकडून पूर्णपणे विभागपूर्वक सांगितले जात आहेत, ते तू ऐक. 

श्लोक 30

प्रवृत्तिं च निवृत्तिं च कार्याकार्ये भयाभये।
बन्धं मोक्षं च या वेत्ति बुद्धिः सा पार्थ सात्त्विकी॥

हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), जी बुद्धी प्रवृत्तिमार्ग व निवृत्तिमार्ग, कर्तव्य व अकर्तव्य, भय व अभय तसेच बंधन व मोक्ष यथार्थपणे जाणते, ती सात्त्विक बुद्धी होय. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इक्विटी, इटीएफ अन्‌ म्युच्युअल फंड

शेअर बाजारातून आर्थिक संपन्नता

बचत-गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी

महावैद्यराज एरंडेल वनस्पती

गुळवेलचे आरोग्यदायी फायदे

विचारांना समजून घेताना

रोगनिवारक अश्‍वगंधा अन्‌ शतावरी

लोक काय म्हणतील..?

मधुमेही अन्‌ उपवास

माझे आरोग्य माझी जबाबदारी...!