भगवत गीता : 18 : श्लोक 41-50
श्लोक 41
ब्राह्मणक्षत्रियविशां शूद्राणां च परन्तप।
कर्माणि प्रविभक्तानि स्वभावप्रभवैर्गुणैः॥
हे परंतपा (अर्थात शत्रुतापना अर्जुना), ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांची कर्मे स्वभावतः उत्पन्न झालेल्या गुणांमुळे निरनिराळी केली गेली आहेत.
श्लोक 42
शमो दमस्तपः शौचं क्षान्तिरार्जवमेव च।
ज्ञानं विज्ञानमास्तिक्यं ब्रह्मकर्म स्वभावजम्॥
अंतःकरणाचा निग्रह, इंद्रियांवर ताबा ठेवणे, धर्मासाठी कष्ट सहन करणे, अंतर्बाह्य शुद्ध राहणे, दुसऱ्यांच्या अपराधांना क्षमा करणे, मन, इंद्रिये व शरीर सरळ राखणे, वेद, शास्त्र, ईश्वर व परलोक इत्यादींवर विश्वास ठेवणे, वेदशास्त्रांचे अध्ययन-अध्यापन करणे आणि परमात्मतत्त्वाचा अनुभव घेणे, ही सर्वच्या सर्व ब्राह्मणाची स्वाभाविक कर्मे आहेत.
श्लोक 43
शौर्यं तेजो धृतिर्दाक्ष्यं युद्धे चाप्यपलायनम्।
दानमीश्वरभावश्च क्षात्रं कर्म स्वभावजम्॥
शौर्य, तेज, धैर्य, चातुर्य, युद्धातून पलायन न करणे, दान देणे आणि स्वामिभाव ही सर्वच्या सर्व क्षत्रियांची स्वाभाविक कर्मे आहेत.
श्लोक 44
कृषिगौरक्ष्यवाणिज्यं वैश्यकर्म स्वभावजम्।
परिचर्यात्मकं कर्म शूद्रस्यापि स्वभावजम्॥
शेती, गोपालन आणि क्रय-विक्रयरूप सत्य व्यवहार ही वैश्याची स्वाभाविक कर्मे आहेत. तसेच सर्व वर्णांची सेवा करणे हे शूद्राचेही स्वाभाविक कर्म आहे.
श्लोक 45
स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते नरः।
स्वकर्मनिरतः सिद्धिं यथा विन्दति तच्छृणु॥
आपापल्या स्वाभाविक कर्मांत तत्पर असलेल्या मनुष्यास भगवत्प्राप्तिरूप परम सिद्धीचा लाभ होतो. आपल्या स्वाभाविक कर्मात रत असलेला मनुष्य ज्या रीतीने कर्म करून परमसिद्धीला प्राप्त होतो, ती रीत तू ऐक.
श्लोक 46
यतः प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततम्।
स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विन्दति मानवः॥
ज्या परमेश्वरापासून सर्व प्राण्यांची उत्पत्ती झाली आहे आणि ज्याने हे सर्व जग व्यापले आहे, त्या परमेश्वराची आपल्या स्वाभाविक कर्मांनी पूजा करून मनुष्य परमसिद्धी मिळवितो.
श्लोक 47
श्रेयान्स्वधर्मो विगुणः परधर्मात्स्वनुष्ठितात्।
स्वभावनियतं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्॥
उत्तम प्रकारे आचरिलेल्या दुसऱ्याच्या धर्मापेक्षा वैगुण्य असलेलाही आपला धर्म श्रेष्ठ आहे. कारण स्वभावाने नेमून दिलेले स्वधर्मरूप कर्म करणाऱ्या माणसाला पाप लागत नाही.
श्लोक 48
सहजं कर्म कौन्तेय सदोषमपि न त्यजेत्।
सर्वारम्भा हि दोषेण धूमेनाग्निरिवावृताः॥
म्हणूनच हे कौंतेया (अर्थात कुंतीपुत्र अर्जुना), सदोष असले तरीही स्वाभाविक कर्म सोडून देऊ नये. कारण धुराने जसा अग्नी, तशी सर्व कर्मे कोणत्या ना कोणत्या दोषाने युक्त असतात.
श्लोक 49
असक्तबुद्धिः सर्वत्र जितात्मा विगतस्पृहः।
नैष्कर्म्यसिद्धिं परमां संन्यासेनाधिगच्छति॥
सर्वत्र आसक्तिरहित बुद्धी असलेला, निःस्पृह आणि अंतःकरण जिंकलेला मनुष्य सांख्ययोगाने त्या श्रेष्ठ नैष्कर्म्यसिद्धीला प्राप्त होतो.
श्लोक 50
सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म तथाप्नोति निबोध मे।
समासेनैव कौन्तेय निष्ठा ज्ञानस्य या परा॥
हे कौंतेया (अर्थात कुंतीपुत्र अर्जुना), जी ज्ञानयोगाची अंतिम स्थिती आहे, त्या नैष्कर्म्यसिद्धीला ज्या रीतीने प्राप्त होऊन मनुष्य ब्रह्माला प्राप्त होतो, ती रीत थोडक्यात तू माझ्याकडून समजून घे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा