भगवत गीता : 18 : श्लोक 51-60
श्लोक 51, 52, 53
बुद्ध्या विशुद्ध्या युक्तो धृत्यात्मानं नियम्य च।
शब्दादीन्विषयांस्त्यक्त्वा रागद्वेषौ व्युदस्य च॥
विविक्तसेवी लघ्वाशी यतवाक्कायमानसः।
ध्यानयोगपरो नित्यं वैराग्यं समुपाश्रितः॥
अहङ्कारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहम्।
विमुच्य निर्ममः शान्तो ब्रह्मभूयाय कल्पते॥
विशुद्ध बुद्धीने युक्त; हलके, सात्त्विक आणि नियमीत भोजन घेणारा; शब्दादी विषयांचा त्याग करून, एकांतात शुद्ध ठिकाणी राहणारा; सात्त्विक धारणाशक्तीने अंतःकरण व इंद्रिये यांच्यावर संयम ठेवून, मन, वाणी आणि शरीर ताब्यात ठेवणारा; राग-द्वेष पूर्णपणे नाहीसे करून चांगल्या प्रकारे दृढ वैराग्याचा आश्रय घेणारा; अहंकार, बळ, घमेंड, कामना, क्रोध, संग्रहवृत्ती यांचा त्याग करून नेहमी ध्यानयोगात तत्पर असणारा; ममतारहित व शांतियुक्त असा पुरुष सच्चिदानंदघन ब्रह्मामध्ये एकरूप होऊन राहण्यास पात्र होतो.
श्लोक 54
ब्रह्मभूतः प्रसन्नात्मा न शोचति न काङ्क्षति।
समः सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम्॥
मग तो सच्चिदानंदघन ब्रह्मात तद्रूप झालेला प्रसन्न चित्ताचा योगी कशाबद्दलही शोक करीत नाही आणि कशाचीही इच्छा करीत नाही. असा सर्व प्राण्यांच्या ठिकाणी सम भाव बाळगणारा योगी माझ्या पराभक्तीला प्राप्त होतो.
श्लोक 55
भक्त्या मामभिजानाति यावान्यश्चास्मि तत्त्वतः।
ततो मां तत्त्वतो ज्ञात्वा विशते तदनन्तरम्॥
त्या पराभक्तीच्या योगाने तो मज परमात्म्याला मी जो आणि जसा आहे, अगदी बरोबर तसाच तत्त्वतः जाणतो, तसेच त्या भक्तीने मला तत्त्वतः जाणून त्याचवेळी माझ्यात प्रविष्ट होतो.
श्लोक 56
सर्वकर्माण्यपि सदा कुर्वाणो मद्व्यपाश्रयः।
मत्प्रसादादवाप्नोति शाश्वतं पदमव्ययम्॥
माझ्या आश्रयाने राहणारा कर्मयोगी सर्व कर्मे नेहमी करीत असला तरी माझ्या कृपेने सनातन अविनाशी परमपदाला प्राप्त होतो.
श्लोक 57
चेतसा सर्वकर्माणि मयि संन्यस्य मत्परः।
बुद्धियोगमुपाश्रित्य मच्चित्तः सततं भव॥
सर्व कर्मे मनाने माझ्या ठिकाणी अर्पण करून तसेच समबुद्धीरूप योगाचा अवलंब करून मत्परायण आणि निरंतर माझ्या ठिकाणी चित्त असलेला हो.
श्लोक 58
मच्चित्तः सर्वदुर्गाणि मत्प्रसादात्तरिष्यसि।
अथ चेत्त्वमहङ्कारान्न श्रोष्यसि विनङ्क्ष्यसि॥
वर सांगितल्याप्रमाणे माझ्या ठिकाणी चित्त ठेवल्याने तू माझ्या कृपेने सर्व संकटातून सहजच पार होशील आणि जर अहंकारामुळे माझे सांगणे न ऐकशील, तर नष्ट होशील अर्थात परमार्थाला मुकशील.
श्लोक 59
यदहङ्कारमाश्रित्य न योत्स्य इति मन्यसे।
मिथ्यैष व्यवसायस्ते प्रकृतिस्त्वां नियोक्ष्यति॥
तू अहंकार धरून मी युद्ध करणार नाही, असे मानतोस, तो तुझा निश्चय व्यर्थ आहे, कारण तुझा स्वभाव तुला जबरदस्तीने युद्ध करावयास लावील.
श्लोक 60
स्वभावजेन कौन्तेय निबद्धः स्वेन कर्मणा।
कर्तुं नेच्छसि यन्मोहात्करिष्यस्यवशोऽपि तत्॥
हे कौंतेया (अर्थात कुंतीपुत्र अर्जुना), जे कर्म तू मोहामुळे करू इच्छित नाहीस, तेही आपल्या पूर्वकृत स्वाभाविक कर्माने बद्ध असल्यामुळे पराधीन होऊन करशील.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा