भगवत गीता : 18 : श्लोक 61-70
श्लोक 61
ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति।
भ्रामयन्सर्वभूतानि यन्त्रारूढानि मायया॥
हे अर्जुना, अंतर्यामी परमेश्वर आपल्या मायेने शरीररूपी यंत्रावर आरूढ झालेल्या सर्व प्राण्यांना त्यांच्या कर्मांनुसार फिरवीत सर्व प्राण्यांच्या हृदयात राहिला आहे.
श्लोक 62
तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत।
तत्प्रसादात्परां शान्तिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम्॥
हे भारता (अर्थात भरतवंशी अर्जुना), तू सर्व प्रकारे त्या परमेश्वरालाच शरण जा. त्या परमात्म्याच्या कृपेनेच तुला परमशांती आणि सनातन परमधाम मिळेल.
श्लोक 63
इति ते ज्ञानमाख्यातं गुह्याद्गुह्यतरं मया।
विमृश्यैतदशेषेण यथेच्छसि तथा कुरु॥
अशा प्रकारे हे गोपनीयाहूनही अतिगोपनीय ज्ञान मी तुला सांगितले. आता तू या रहस्यमय ज्ञानाचा संपूर्णपणे चांगला विचार करून मग जसे तुला आवडेल तसे कर.
श्लोक 64
सर्वगुह्यतमं भूयः शृणु मे परमं वचः।
इष्टोऽसि मे दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितम्॥
सर्व गोपनीयांहून अतिगोपनीय माझे परम रहस्ययुक्त वचन तू पुन्हा ऐक. तू माझा अत्यंत आवडता आहेस, म्हणून हे परम हितकारक वचन मी तुला सांगणार आहे.
श्लोक 65
मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु।
मामेवैष्यसि सत्यं ते प्रतिजाने प्रियोऽसि मे॥
तू माझ्या ठिकाणी मन ठेव. माझा भक्त हो. माझे पूजन कर आणि मला नमस्कार कर. असे केले असता तू मलाच येऊन मिळशील. हे मी तुला सत्य प्रतिज्ञापूर्वक सांगतो. कारण तू माझा अत्यंत आवडता आहेस.
श्लोक 66
सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज।
अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः॥
सर्व धर्म म्हणजे सर्व कर्तव्यकर्मे मला अर्पण करून तू केवळ सर्वशक्तिमान, सर्वाधार अशा मला परमेश्वरालाच शरण ये. मी तुला सर्व पापांपासून सोडवीन. तू शोक करू नकोस.
श्लोक 67
इदं ते नातपस्काय नाभक्ताय कदाचन।
न चाशुश्रूषवे वाच्यं न च मां योऽभ्यसूयति॥
हा गीतारूप रहस्यमय उपदेश कधीही तप न करणाऱ्या माणसाला सांगू नये. तसेच भक्तिहीन माणसाला आणि ऐकण्याची इच्छा नसणाऱ्यालाही सांगू नये. त्याचप्रमाणे माझ्यामध्ये दोष पाहणाऱ्याला तर कधीही सांगू नये.
श्लोक 68
य इमं परमं गुह्यं मद्भक्तेष्वभिधास्यति।
भक्तिं मयि परां कृत्वा मामेवैष्यत्यसंशयः॥
जो पुरुष माझ्या ठिकाणी परम प्रेम ठेवून हे परम रहस्ययुक्त गीताशास्त्र माझ्या भक्तांना सांगेल, तो मलाच प्राप्त होईल, यात मुळीच शंका नाही.
श्लोक 69
न च तस्मान्मनुष्येषु कश्चिन्मे प्रियकृत्तमः।
भविता न च मे तस्मादन्यः प्रियतरो भुवि॥
माझे अत्यंत प्रिय कार्य करणारा त्याच्याहून अधिक मनुष्यांत कोणीही नाही. तसेच पृथ्वीवर त्याच्याहून अधिक मला प्रिय दुसरा कोणी भविष्यकाळी होणारही नाही.
श्लोक 70
अध्येष्यते च य इमं धर्म्यं संवादमावयोः।
ज्ञानयज्ञेन तेनाहमिष्टः स्यामिति मे मतिः॥
जो पुरुष आम्हा दोघांच्या धर्ममय संवादरूप या गीताशास्त्राचे अध्ययन करील, त्याच्याकडूनही मी ज्ञानयज्ञाने पूजित होईन, असे माझे मत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा