भगवत गीता : 18 : श्लोक 71-78

श्लोक 71

श्रद्धावाननसूयश्च शृणुयादपि यो नरः।
सोऽपि मुक्तः शुभाँल्लोकान्प्राप्नुयात्पुण्यकर्मणाम्‌॥

जो मनुष्य श्रद्धायुक्त होऊन दोषदृष्टी न ठेवता या गीताशास्त्राचे श्रवण करील, तोही पापांपासून मुक्त होऊन पुण्यकर्मे करणाऱ्यांच्या श्रेष्ठ लोकांना प्राप्त होईल. 

श्लोक 72

कच्चिदेतच्छ्रुतं पार्थ त्वयैकाग्रेण चेतसा।
कच्चिदज्ञानसम्मोहः प्रनष्टस्ते धनञ्जय॥

हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), हे गीताशास्त्र तू एकाग्र चित्ताने ऐकलेस का? आणि हे धनंजया (अर्थात अर्जुना), तुझा अज्ञानातून उत्पन्न झालेला मोह नाहीसा झाला का? 

श्लोक 73

अर्जुन उवाच नष्टो मोहः
स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत।
स्थितोऽस्मि गतसन्देहः करिष्ये वचनं तव॥

अर्जुन म्हणाला, हे अच्युता (अर्थात श्रीकृष्णा), आपल्या कृपेने माझा मोह नाहीसा झाला आणि मला स्मृती प्राप्त झाली. आता मी संशयरहित होऊन राहिलो आहे. म्हणून मी आपल्या आज्ञेचे पालन करीन.

श्लोक 74

सञ्जय उवाच इत्यहं
वासुदेवस्य पार्थस्य च महात्मनः।
संवादमिममश्रौषमद्भुतं रोमहर्षणम्‌॥

संजय म्हणाले, अशा प्रकारे मी श्रीवासुदेव आणि महात्मा पार्थ (अर्थात पृथापुत्र अर्जुन) यांचा हा अद्‌भुत रहस्यमय रोमांचकारक संवाद ऐकला.

श्लोक 75

व्यासप्रसादाच्छ्रुतवानेतद्‍गुह्यमहं परम्‌।
योगं योगेश्वरात्कृष्णात्साक्षात्कथयतः स्वयम्‌॥

श्रीव्यासांच्या कृपेने दिव्य दृष्टी मिळवून मी हा परम गोपनीय योग अर्जुनाला सांगत असताना स्वतः योगेश्वर भगवान श्रीकृष्णांकडून प्रत्यक्ष ऐकला आहे.

श्लोक 76

राजन्संस्मृत्य संस्मृत्य संवादमिममद्भुतम्‌।
केशवार्जुनयोः पुण्यं हृष्यामि च मुहुर्मुहुः॥

हे महाराज (धृतराष्ट्र), भगवान केशव (अर्थात श्रीकृष्ण) आणि अर्जुन यांचा हा रहस्यमय, कल्याणकारक आणि अद्‍भुत संवाद पुन्हा पुन्हा आठवून मी वारंवार आनंदित होत आहे. 

श्लोक 77

तच्च संस्मृत्य संस्मृत्य रूपमत्यद्भुतं हरेः।
विस्मयो मे महान्‌ राजन्हृष्यामि च पुनः पुनः॥

हे महाराज (धृतराष्ट्र), श्रीहरीचे ते अत्यंत अलौकिक रूपही वरचेवर आठवून माझ्या मनाला खूप आश्चर्य वाटत आहे आणि मी वारंवार हर्षपुलकित होत आहे. 

श्लोक 78

यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः।
तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम॥

जेथे योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आहेत आणि जेथे गांडीव धनुष्य धारण करणारा पार्थ (अर्थात पृथापुत्र अर्जुन) आहे, तेथेच श्री, विजय, विभूती आणि अचल नीती आहे, असे माझे मत आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इक्विटी, इटीएफ अन्‌ म्युच्युअल फंड

शेअर बाजारातून आर्थिक संपन्नता

बचत-गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी

कुटुंबातील आदर्श पालकत्व अन्‌ मुलं

स्वनियंत्रक अन्‌ आदर्श बना...!

महावैद्यराज एरंडेल वनस्पती

भविष्य आर्थिक विकासाचे

यशस्वी ट्रेडर्स अन्‌ गुंतवणूकदार बना

मधुमेही अन्‌ उपवास

आर्थिक विकासाची गुरूकिल्ली