सकारात्मकतेत जिंकण्याचं बळ
सतत उतार चढाव्याने भरलेल्या या जीवनात सकारात्मक राहणं तसं कठीणच असतं. पण सकारात्मक उर्जा स्वीकारणे हेपण पूर्णपणे आपल्या इच्छाशक्तीवर अवलंबून असतं. वाढत्या नकारात्मकतेमध्ये सकारात्मकता स्वतःहून आपल्याकडे येणार नाही. त्यासाठी स्वतःहून सकारात्मकतेला निवडावं लागेल. शारीरिक आणि मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी नकारात्मकतेपासून दूर राहणं फार आवश्यक असतं. लक्षात असू द्या, सकारात्मकतेत जिंकण्याचं बळं असतं. म्हणून मनात सकारात्मकतेची मशाल सतत पेटतीच ठेवावी.
सकारात्मक शब्दांत प्रगतीची दिशा : सतत सकारात्मक शब्दांचा वापर करायला हवा. जसे, मी आभारी आहे, हे करण्यासाठी मी तयार आहे, मला हे शिकायला आवडेल असे सकारात्मक शब्दच प्रगती घडवून आणतात. आपल्या बोलण्याची पद्धत सकारात्मक आणि नकारात्मक दोन्हीही उर्जा आकर्षित करतात. प्रेम, समाधान, आनंद, सुरक्षित अशा शब्दांच्या वापराने एक चांगला सकारात्मक दृष्टीकोन तयार होतो. यामुळे आपलं मन प्रसन्न तर राहतच शिवाय मित्र-परिवारांतही आपल्या वर्तणुकीतून आदर्श अन् सकारात्मक संदेशही पोहोचतो.
ही वेळपण निघून जाईल : हे लक्षात असू द्या की, परिस्थिती बदलत असते, कुठलीच वेळ थांबून राहत नाही. सगळ्या गोष्टी बदलत राहतात. आज दुःखात असाला, तर ही वेळ पण निघून जाईल, असं आपल्या मनाला सांगायला हवे. वेळ आली की परिस्थितीत नक्कीच बदल घडून येताे. या जगात कोणतीच गोष्ट पर्मनंट नाही. सगळ्या गोष्टी बदलत राहतात. आपले वर्तनच वर्तमानावर लक्ष केंद्रीत करते. हेच आपल्याला नकारात्मकता सोडून सकारात्मकतेने कार्यक्षम ठेवते.
स्वतःवर प्रेम अन् विश्वास ठेवा : सकारात्मक उर्जेला आकर्षित करण्यासाठी स्वतःवर प्रेम अन् विश्वास ठेवणं फार आवश्यक असतं. जेव्हा कुणी आपल्याला दोष देतं तेव्हा स्वतःवर संशय न घेता दोषी नसल्याचा विश्वास असायला हवा. सकारात्मक असाल तर अधिक सकारात्मकतेला स्वतःकडे आकर्षित करता येते. जसा स्वभाव तशाच विचारांना आपण स्वतःकडे आकर्षित करतो. म्हणून स्वभाव स्वात्विक विचारांचाच असावा. यामुळे सकारात्मक जीवन जगण्यास मदत मिळेल.
(कैलास एन. हिरोडकर) संपादक, संचालक : एचके ब्लॉग आणि एचके लर्निंग अँड एनएए (लेखक निसर्ग अभ्यासक आणि शेअर बाजाराचे स्वतंत्र विश्लेषक आहेत.)
Blog : https://hklearning-naa.blogspot.com
Video : https://youtu.be/FyWl4a3CzwI



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा