अन्न पूर्णब्रह्म अन् यज्ञकर्मही
देह सक्रिय असण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते. ही ऊर्जा आहारातून मिळते. जीवात्मा प्राणाच्या रुपात देहात स्थित असतो. प्राण म्हणजेच परमात्म्याचा अंश. या जिवात्म्याची काळजी घेण्यासाठी मन, बुध्दी आणि इंद्रिय कार्यरत असतात. यात मन हे सात्विक असावे लागते. सात्विक मन असण्यासाठी आहारही सात्विक असायला हवा. बुद्धीने मनावर नियंत्रण ठेवून आपला स्वभावगुण सात्विक ठेवायला हवा. अन्न ग्रहण करताना आपण प्राणाचे चिंतन करत प्राणाय स्वाहा म्हणत जेवण करायला हवे. मुखातून अन्न जठराग्नीपर्यंत कसे पोहचत आहे हे आंतरिक नेत्राने पहावे. म्हणजे अन्न ग्रहण करताना ध्यानस्त होत हे कर्म होईल. परिणामी आयुष्यात सकारात्मकता वाढेल आणि ध्येयप्राप्ती पूर्णत्वास येऊन सुख, शांती, समाधान आणि समृध्दी मिळेल.
यज्ञ समजून अन्नसेवन : अन्न हे पूर्णब्रह्म आहे. केवळ पोट भरण्यासाठी नव्हे, तर यज्ञ समजून अन्नसेवन करायचे असते. अन्न कर्तव्य म्हणून खावे. पवित्र वातावरणात बसून, यज्ञकुंडात जशा सावकाश आहुत्या दिल्या जातात तसे सावकाश अन्न खावे. यज्ञाच्या वेळी आहुत्या देण्याआधी अग्नीचे आवाहन केलेले असते, तसे जेवायच्या आधी भूक लागलेली असावी, जाठराग्नी प्रदीप्त झालेला असावा, तोंडात घास घोळतो आहे, मळमळते आहे अशी अवस्था नसावी. अशा वेळी लंघन करावे, विझलेला जाठराग्नी पुन्हा प्रदीप्त होऊ द्यावा. यासाठी नैसर्गिक औषधांची मदत घ्यायला हवी. अग्नी प्रदीप्त नसताना पोटात अन्न ढकलले तर पोट भरले तरी यज्ञ होणार नाही, ॲसिडिटी होईल, पोट दुखेल-फुगेल, गॅस दूर सरण्यासाठी उपाय करावे लागतील. हा यज्ञ नव्हे, हे शास्त्रविधीने सांगितलेले कर्म नव्हे. अन्न शिजवलेले हवे, शिळे नसावे, गरम असावे, सुखासमाधानात बसून खावे. भगवंतांनी सांगितलेली यज्ञसंकल्पना ज्याला कळली त्याला जीवनात वेळोवेळी यज्ञ करावे लागते हे लक्षात येईल.
आहार सात्त्विक असावा : आयुष्य, बुद्धी, सुख, प्रीती वाढविणारा आहार म्हणजे सात्त्विक आहार मानला जातो. हा आहार सात्विक वृत्तीच्या मनुष्याच्या आवडीचा असतो. निरोगी आयुष्य जगण्यासाठी आहार सात्विक आणि रससयुक्त असावा. त्वचेचा रंग शरीरातील रक्तधातूवर अवलंबून असतो. रक्त शुद्ध व भरपूर असले तर कांती उजळ व तेजस्वी असते. रक्त अवलंबून असते रसावर म्हणून आहार रसयुक्त असायला हवा. भात पोळीच्या मानाने रसात्मक असतो, पोळी भाताच्या मानाने शुष्क असते. त्यामुळे दूध-भात, डाळ-भात, आमटी-भात, कढी-भात खाणे रसात्मक आहार ठरतो. कोरडे पदार्थ रसयुक्त नसतात या पदार्थांचा समावेश आहारात नियमित असल्यास त्वचा शुष्क बनत जाते. परिणामी त्वेचेवरील तेजही नाहीसे होते.
आहार तामसिक नसावा : अन्न शिळे झाल्यावर त्यातील रस कमी होतो, सात्त्विकता कमी होते. रसामुळे शरीरातील सप्तधातूंचे वर्धन होते. रस पर्याप्त मात्रेत मिळण्यासाठी अन्न रसपूर्ण हवे. जीवनाचा आनंद घेत घेत जीवन जगले पाहिजे. ज्याला जीवनात रस नसतो, त्याला कशातच रस नसतो. अशा व्यक्ती सगळ्यावर सारखी टीका करत राहतात. रसहीन गोष्टी तामसिक व्यक्तीला प्रिय असतात. तामसिकपणा वाढला तर पुढे अकल्याणच होते. रसहीन, दुर्गंधी सुटलेले, आंबलेले, नासलेले अन्न खाऊ नये. मांसाहार हे तामसिक असते. असे अन्न तामसिक वृती वाढवते. आयुष्यात नकारात्मक ऊर्जा वाढून संपूर्ण वंशाचा नाश होतो. आयुष्यात सकारात्मकता आणण्यासाठी सत्त्वगुण असणे गरजेचे आहे. सत्वगुण सात्विक आहारातून वाढते. हे सत्वगुण परमेश्वर प्राप्तीचा एकमेव मार्ग असल्याचे भगवंतांनी त्यांच्या अवतार कार्यातून सांगितलेले आहे.
- कैलास एन. हिरोडकर संपादक, संचालक : एचके ब्लॉग आणि एचके लर्निंग अँड एनएए (लेखक निसर्ग अभ्यासक आणि शेअर बाजाराचे स्वतंत्र विश्लेषक आहेत.)
Blog : https://hklearning-naa.blogspot.com
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा