मुंबई आणि मी
मी आणि लोकल : लोकलमधील प्रवास खूपच त्रासदायक असतो. असा समज काही दिवसातच दूर झाला. लोकल जिवलग मैत्रीण असल्यागत वाटायला लागली. स्टेशनवर तिने कधीच उशीर केला नाही. प्रत्येक 5 मिनिटानंतर लोकल उपलब्ध होती. प्रवाशांनी खचाखच भरलेली लोकल आणि त्यात लोकांची स्वयंशिस्त पाहून नवल वाटत होते. जो लांब उतरणार असेल तो स्वतः मध्ये जाऊन दोन पायावर उभे राहता येईल एवढीच जागा व्यापायचा. ज्याचे स्टेशन पुढे लगेच असेल तो गेट जवळ तेवढ्याच जागेत उभा राहायचा. स्टेशन आल्यावर एकमेकांना आधार देत चढ - उतर होत असायची. बऱ्याचदा अनोळखी प्रवाशाने मला सांभाळत प्रवासात मदत केली जणू ही त्याची जबाबदारीच आहे. नकळत मलाही प्रवाशांची काळजी घेण्याची सवय लागली. काही दिवसानंतर लक्षात आले की येथे शिस्त आपोआप लागते, लावावी किंवा शिकवावी लागत नाही. मुंबईत येऊन आता एक महिना पूर्ण झाला होता. यादरम्यान लोकल घर वाटायला लागली, घरी जाण्याची जशी वाट पाहतो तसेच लोकलविषयी झाले. मुंबईची लाईफ लाईन का म्हणतात लोकलला आज कळाले आणि तसा प्रत्यक्ष अनुभवही घेत होतोच. इथली बिचारी लोक जेवढी घरात निवांत नसतात तेवढी लोकलमध्ये बसल्यावर असतात. बरीच महत्वाची काम मोबाईलद्वारे लोकलमध्ये बसून करतात. घर फक्त झोपण्या पुरतेच..! लोकलही प्रामाणिक..! काळजीवाहू..! 20 ते 30 सेकंद थांबते पण यादरम्यान चढणाऱ्या आणि उतरणाऱ्या प्रवाशांचा वेग आणि एकमेकांना आधार देण्याची लगबग पाहून, नकळत किती ही लोक एकमेकांची काळजी घेतात हे लक्षात येते. व्यवहार, भावना आणि शिस्त हा त्रिवेणी संगम येथे पाहायला मिळाला. आता मीही त्यांच्यातलाच वाटात होतो. लोकलमध्ये बसल्यावर निवांत अर्ध्या तासात मोबाईलद्वारे महत्वाची कामं मीही उरकवत होतो.
- कैलास एन. हिरोडकर संपादक, संचालक : एचके ब्लॉग आणि एचके लर्निंग अँड एनएए (लेखक निसर्ग अभ्यासक आणि शेअर बाजाराचे स्वतंत्र विश्लेषक आहेत.)
Blog : https://hklearning-naa.blogspot.com
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा