महिला आणि क्रिकेट
महिला कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकते. क्रिकेट या क्षेत्रातही महिलांनी आघाडी मारली आहे. चार वर्षांनी येणारा एकदिवसीय क्रिकेटचा (पुरुष/महिला) विश्वकरंडक म्हणजे क्रीडाप्रेमींसाठी पर्वणीच असते. आत्तापर्यंत ११ वेळा महिला विश्वकरंडक स्पर्धा झाली. यात ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक म्हणजे सहा वेळा, इंग्लंडने चार वेळा तर न्यूझीलंडने एकदा ही स्पर्धा जिंकली. भारतीय महिला संघाने आत्तापर्यंत दोन वेळा स्पर्धेची अंतिम फेरी गाठली असून एकदा ऑस्ट्रेलिया (२००५) व इंग्लंड (२०१७)कडून पराभव पत्करावा लागला. या दोन्ही वेळी भारतीय संघाची कर्णधार मिताली राज होती.
महिला क्रिकेटची सचिन तेंडुलकर
मिताली राज भारतीय क्रिकेटला पडलेले सुंदर स्वप्नच म्हणावे लागेल. मितालीने आत्तापर्यंत २१६ एकदिवसीय सामने खेळले असून, ५१.१७ च्या सरासरीने सात हजार धावा केल्या आहेत. यामध्ये सहा शतके व ५० अर्धशतकांचा समावेश आहे. अकरा टेस्ट सामन्यांमधून ६६३ धावा केल्या असून त्यात एक शतक व चार अर्धशतकांचा समावेश आहे. टी-२० प्रकारातही तिने ८९ सामने खेळले असून, त्यातही दोन हजार धावा केल्या आहेत. क्रिकेटच्या तीनही प्रकारात दहा हजारांपेक्षा जास्त धावा तिच्या नावावर आहेत. याचबरोबर गोलंदाजीतही बळी मिळवून आपण अष्टपैलू असल्याचे तिने सिद्ध केले आहे. रॉबिन राऊंड पद्धतीने होणाऱ्या आशिया करंडक स्पर्धा आत्तापर्यंत सात वेळा झाली असून, त्यात भारताने सहा विजय मिळवले आहेत. या स्पर्धेतही मितालीने आपली छाप पाडली. यात भारताकडून खेळताना तिने ५८८ धावा केल्या आहेत. आशिया करंडक स्पर्धेत नितू डेव्हिडने सर्वाधिक २६ बळी घेतले आहेत. २००४ साली मितालीला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
महिला क्रिकेटची कपिल देव
ज्याप्रमाणे भारतीय पुरुष क्रिकेट संघात कपिल देव यांचा दबदबा होता तसाच दबदबा झूलन गोस्वामीने आपल्या कर्तृत्वाने आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण केला आहे. झूलनने भारताकडून १९९ एकदिवसीय सामने खेळतांना २५० बळी मिळवून जगातील सर्वाधिक बळी घेणारी पहिली महिला गोलंदाज बनली आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिने एक हजार १८३ धावा केल्या असून, तिची सर्वोच्च धावसंख्या ५७ आहे. १२ टेस्ट सामन्यांमधून झूलनने ४४ बळी तर फलंदाजीतही दोन अर्धशतकांसह २९१ धावा केल्या आहेत. क्रिकेटच्या टी- २० प्रकारातही ६८ सामने खेळतांना ५६ बळी घेत २९१ धावा केल्या आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात ३१ धावांत ६ बळी ही तिची सर्वोत्तम कामगिरी आहे. २००७ साली झूलनला आयसीसीचा पुरस्कार मिळाला आहे. झूलनने भारतीय महिला क्रिकेट संघाचे कर्णधारपदही भूषविले आहे.
महिला क्रिकेट संघ..!
मिताली राज व झूलन गोस्वामी या दोघींनी महिला विश्वकरंडकात सहा वेळा भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. संघात स्मृती मानधना, यास्तिका भाटिया, दिप्ती शर्मा, हरमनप्रीत कौर, स्नेह राणा, रिचा घोष, पूजा वस्त्रकार, मेघना सिंग, राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव, तानिया भाटिया, शफाली वर्मा आदी आपापली कामगिरी चोख बजावत आहेत. भारतीय महिला संघाने पाकिस्तान व वेस्ट इंडिजविरुद्ध विजय प्राप्त केलेला आहे. महिला संघाची वाटचाल खडतर असली, तरी अशक्य नाही. स्मृती मानधना, मिताली राज, हरमनप्रीत कौर, मेघना सिंग, स्नेह राणा, झूलन यांना कठोर परिश्रम घ्यावे लागतील. भारतीय महिला क्रिकेटचे भवितव्य उज्ज्वल आहे. यात मुळीच शंका नाही.
मोबाईल : ९८२३९७०४२५
(लेखक क्रीडा क्षेत्राचे अभ्यासक आहेत.)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा