द काश्मीर फाइल
इतिहास म्हणजे आयुष्याच्या वाटेवरचा मार्गदर्शक फलकच आहे. हा मार्गदर्शक फलक योग्य दिशादर्शक असेल तर भविष्य योग्य त्या वळणावर जाते. भूतकाळात घडलेल्या घटनांचा लेखाजोखा तंतोतंत म्हणजे आहे तसा नोंदविला गेला पाहिजे. तो जर चुकीच्या पद्धतीने नोंदविला गेला तर भविष्य भरकटण्याची भीती असते. चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा 'द काश्मीर फाइल' हा चित्रपट असेच काहीसे सांगून जातो. चित्रपट विचारपूर्वक आणि इतिहासातील संदर्भ घेत पहिला तर नक्कीच सत्य आरसा म्हणून समोर येईल. ही कथा काश्मीरमध्ये वास्तव्यास असलेल्या हिंदू काश्मिरी पंडित जनसमुदायाची आहे. १९ जानेवारी १९९० साली येथील रस्त्यांवर मोर्चे निघतात. धर्मातर, पळा किंवा मरा अशी घोषणाबाजी समाजकंटकांकडून होते. अशातच एका कुटुंबातील कुटुंबप्रमुखाची निघृणपणे हत्या करण्यात येते. अशीच परिस्थिती इतर कुटुबाचीही होताना दिसते. मरणाच्या भितीने लोक आपली राहती घरे सोडून इतर ठिकाणी स्थलांतरित होतात. ज्या ठिकाणी स्थलांतरित होतात त्याठिकाणी जगण्यासाठी मूलभूत गोष्टींचा अभाव असतो. संबंधितांकडून सुविधा पुरवण्याचे आश्वासन त्यांना दिले जाते. मात्र यांच्या नशिबी केवळ आणि केवळ मरण यातनाच येतात.
काळ पुढे सरकत जातो, संकटांनी भरलेले भयग्रस्त आयुष्य जगणेही सुरूच असते. येणारी पुढची पिढीही याच अवस्थेतून जात असते. मात्र भूतकाळात काय, कसे आणि का घडले याचा विसर पडतो. मागच्या पिढीला काय यातना सहन कराव्या लागल्या, त्याला जबाबदार कोण, यातना कुणी आणि का दिल्या? याची पुसटशी कल्पना या नवीन पिढीला नसते. ही पिढी फ्रिडम नावाखाली भरकटलेली दिसते. अशातच एका कॉलेज तरुणाच्या आजोबांचे निधण होते. आजोबांची अंतिम इच्छा म्हणजे त्यांच्या देहाची राख कश्मीरमध्ये असलेल्या त्यांच्या घरी विलीन व्हावी..! ज्या घरातून या काश्मिरी पंडितांना हाकलवून लावलेले होते. आजोबांची इच्छा आणि काश्मीर मधील घर या दोन गोष्टी तरुणाला विचार करण्यास भाग पडतात. यामुळेच या तरुणाची कश्मीरसाठीची विशेषकरून भूतकाळ जाणून घेण्याची उत्सुकता वाढते. तो आजोबांच्या मित्रांसोबत त्या ठिकाणी येतो, जिथे पूर्वी त्याच्या आजोबांसोबत सर्व कुटुंब राहत होते. तरुणाच्या मनात प्रश्न एकच असतो, की नक्की का आजोबा या कश्मीरसाठी लढत होते.
चित्रपटात भूतकाळ बघताना मन सुन्न होते. कशा प्रकारे देशाबाहेरून आलेल्या लोकांनी घूसखोरी करत आक्रमण केले. पिढ्यानपिढ्या येथे राहत असलेल्या काश्मिरी पंडितांवर अत्याचार करत घरे सोडण्यास भाग पाडले. सर्वानीच हा आक्रोश न ऐकता आपापले कान बंद करून घेतले होते. हे सर्व ऐकल्यानंतर तरुण सत्याच्या शोधात निघतो आणि जेव्हा सत्य अगदी समोर येऊन उभे असते, तेव्हा त्याला फ्रिडम, आजादी, स्वतंत्रता या शब्दाचा खरा अर्थ उमजतो.
ज्ञान हा असा मार्ग आहे कि ज्यामुळे यशोशिखर गाठणे शक्य होते. तसेच देशाचे उज्वल भविष्य हवे असेल तर खऱ्या इतिहासाची जाण असणे अतिआवश्यक आहे. अन्यथा पिढ्यानपिढ्या भरकटण्याची शक्यता असते. जे आपण चित्रपट पाहताना अनुभवतो. आज देशातीलच काय तर खुद्द काश्मीर मधील जनतेलाही खरा इतिहास माहित नसावा. म्हणूनच चित्रपटात घडलेला खरा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. खरे तर इतिहासकारांची प्रत्येक घटनेवर पकड असायला हवी, कारण हाच इतिहास भविष्यात संदर्भासाठी मोठा आधार असतो. मात्र काश्मीरबद्दल याबाबतीत कसूर झाल्याचे दिसते.
या चित्रपटाच्या शेवटी १५-२० मिनिटांचा मोनोलॉग बरेच काही सांगून जातो. त्यासाठी विचारपूर्वक चित्रपट पाहणे आवश्यक आहे. अहिंसा आणि हिंसा यातील फरक समजून घेण्याची आज नितांत गरज आहे. हे शब्द उच्चारताना किंवा समजावताना, समजून घेताना विचार-मंथन झालेच पाहिजे, तरच घडणाऱ्या घटनांना खरा न्याय देणे शक्य होईल. त्यातूनच खरा इतिहासही लिहला जाईल, जो पुढील पिढींसाठी मार्गदर्शक म्हणून काम करण्यास समर्थ राहील.
चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी इतिहास उलगडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्याचे दिसते. जगात ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत किंवा घडत आहेत. यावर प्रकाश टाकण्याचा प्रामाणिक प्रयत्न इतिहासकारांकडून होणे गरजेचे आहे. ‘द काश्मीर फाइल’ हा एक चित्रपट म्हणून न पाहता संवेदनशीलता आणि बुद्धी जागृत ठेवून पाहिला तर स्वर्ग आणि नर्क या कल्पना गळून पडतील. खरंच, सुंदर जग घडवण्यासाठी माणूसपणाची पेरणी करणे खुपच गरजेचे आहे.
लेखक चित्रपट समीक्षक आहेत.
Email : Ugalemeghnil@gmail.com
मोबाईल : 9168538581

As a matter of fact, you are superior in the way you think as well as written this review. Excellent!!
उत्तर द्याहटवाThank you so much.🙏🏻 Your comment means a lot for me.
हटवा