भगवत गीता : 8 श्लोक 1-10

अध्याय ८ – अक्षरब्रह्मयोग

श्लोक १

अर्जुन उवाच किं तद्ब्रह्म
किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम।
अधिभूतं च किं प्रोक्तमधिदैवं किमुच्यते॥

अर्जुन म्हणाला, हे पुरुषोत्तम श्रीकृष्णा, ते ब्रह्म काय आहे? अध्यात्म काय आहे? कर्म काय आहे? अधिभूत शब्दाने काय सांगितले आहे? आणि अधिदैव कशाला म्हणतात? 

श्लोक २

अधियज्ञः कथं कोऽत्र देहेऽस्मिन्मधुसूदन।
प्रयाणकाले च कथं ज्ञेयोऽसि नियतात्मभिः॥

हे मधुसूदना (श्रीकृष्णा), येथे अधियज्ञ कोण आहे? आणि तो या शरीरात कसा आहे? तसेच अंतकाळी युक्त चित्ताचे पुरुष तुम्हाला कसे जाणतात? 

श्लोक ३

श्रीभगवानुवाच अक्षरं ब्रह्म
परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते।
भूतभावोद्भवकरो विसर्गः कर्मसञ्ज्ञितः॥
 

भगवान श्रीकृष्ण म्हणाले, परम अक्षर ब्रह्म आहे. आपले स्वरूप अर्थात जीवात्मा अध्यात्म नावाने सांगितला जातो. तसेच भूतांचे भाव उत्पन्न करणारा जो त्याग आहे, तो कर्म या नावाने संबोधला जातो. 

श्लोक ४

अधिभूतं क्षरो भावः पुरुषश्चाधिदैवतम्‌।
अधियज्ञोऽहमेवात्र देहे देहभृतां वर॥

उत्पत्ती-विनाश असलेले सर्व पदार्थ अधिभूत आहेत. हिरण्यमय पुरुष अधिदैव आहे आणि हे देहधाऱ्यांमध्ये श्रेष्ठ अर्जुना, या शरीरात मी वासुदेवच अंतर्यामी रूपाने अधियज्ञ आहे. 

श्लोक ५

अन्तकाले च मामेव स्मरन्मुक्त्वा कलेवरम्‌।
यः प्रयाति स मद्भावं याति नास्त्यत्र संशयः॥

जो पुरुष अंतकाळीही माझेच स्मरण करीत शरीराचा त्याग करून जातो, तो साक्षात माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो, यात मुळीच संशय नाही. 

श्लोक ६

यं यं वापि स्मरन्भावं त्यजत्यन्ते कलेवरम्‌।
तं तमेवैति कौन्तेय सदा तद्भावभावितः॥ 

हे कुंतीपुत्र अर्जुना, हा मनुष्य अंतकाळी ज्या ज्या भावाचे स्मरण करीत शरीराचा त्याग करतो, त्याला त्याला तो जाऊन मिळतो. कारण तो नेहमी त्याच भावाचे चिंतन करीत असतो. 

श्लोक ७

तस्मात्सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च।
मय्यर्पितमनोबुद्धिर्मामेवैष्यस्यसंशयम्‌॥

म्हणून हे अर्जुना, तू सर्वकाळी निरंतर माझे स्मरण कर आणि युद्धही कर. अशा प्रकारे माझ्या ठिकाणी मन-बुद्धी अर्पण केल्यामुळे तू निःसंशय मलाच येऊन मिळशील. 

श्लोक ८

अभ्यासयोगयुक्तेन चेतसा नान्यगामिना।
परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिन्तयन्‌॥

हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), असा नियम आहे की, परमेश्वराच्या ध्यानाच्या अभ्यासरूपी योगाने युक्त, दुसरीकडे न जाणाऱ्या चित्ताने निरंतर चिंतन करणारा मनुष्य, परम प्रकाशस्वरूप दिव्य पुरुषाला म्हणजे परमेश्वरालाच जाऊन मिळतो.

श्लोक ९

कविं पुराणमनुशासितारमणोरणीयांसमनुस्मरेद्यः।
सर्वस्य धातारमचिन्त्यरूपमादित्यवर्णं
तमसः परस्तात्‌॥

जो पुरुष सर्वज्ञ, अनादी, सर्वांचा नियामक, सूक्ष्माहूनही अतिसूक्ष्म, सर्वांचे धारण-पोषण करणारा, अतर्क्यस्वरूप, सूर्याप्रमाणे नेहमी चेतन प्रकाशरूप आणि अविद्येच्या अत्यंत पलीकडील अशा शुद्ध सच्चिदानंदघन परमेश्वराचे स्मरण करतो

श्लोक १०

प्रयाणकाले मनसाचलेन
भक्त्या युक्तो योगबलेन चैव।
भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक्‌
स तं परं पुरुषमुपैति दिव्यम्‌॥ 

तो भक्तियुक्त पुरुष अंतकाळीसुद्धा योगबलाने भुवयांच्या मध्यभागी प्राण चांगल्या रीतीने स्थापन करून मग निश्चल मनाने स्मरण करीत त्या दिव्यरूप परम पुरुष परमात्म्यालाच प्राप्त होतो. 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इक्विटी, इटीएफ अन्‌ म्युच्युअल फंड

शेअर बाजारातून आर्थिक संपन्नता

बचत-गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी

कुटुंबातील आदर्श पालकत्व अन्‌ मुलं

स्वनियंत्रक अन्‌ आदर्श बना...!

महावैद्यराज एरंडेल वनस्पती

भविष्य आर्थिक विकासाचे

यशस्वी ट्रेडर्स अन्‌ गुंतवणूकदार बना

मधुमेही अन्‌ उपवास

आर्थिक विकासाची गुरूकिल्ली